रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक यांची व्यथा...

पुस्तकांची थोडीफार माहिती असणाऱ्या पन्नाशीतल्या पुरुषांपुढे गुरुनाथ नाईक हे नाव उच्चारलं तरी ते ओसंडून बोलू लागतात. कॅप्टन दीप, शिलेदार, गरुड कथा, धुरंदर कथा, शब्दवेदी, रातराणी अशा रहस्यकथांची यादी सांगू लागतात. शौर्य, गुप्तहेरी आणि गुन्हे जगताला फॅन्टसीचा साज चढवणाऱ्या या लेखकावर वाचक वेड्यासारखे प्रेम करतात. रहस्यकथांच्या पोशिंद्याला एकदा तरी भेटण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. असे लोकप्रियतेचा आयाम स्थापन करणारे रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक आज स्वतः तारणहाराच्या प्रतीक्षेत आहेत. गोवा सरकारने घर दिल्याने डोक्‍यावर छप्पर आहे. पण दोन वेळच्या अन्नाचं काय? हा प्रश्‍न नाईक दांपत्याला सतावतो आहे. वयाची पंचाहत्तरी गाठलेली. सोबतीला फक्त बायको आणि मानेचं जीवघेणं दुखणं. शारीरिक अस्वास्थ्यामुळे घराचा उंबरा ओलांडण्याचीही धास्ती. दुखण्यामुळे लिखाणाचा वेग मंदावलेला. त्यामुळे रोजीरोटीचं साधन संपल्यात जमा. अशावेळी आयुष्याची कमाई कामी यायला हवी. पण लेखन आणि पत्रकारितेच्या क्षेत्रानं त्यांची झोळी रितीच ठेवली. चार रुपयांच्या मानधनावर रहस्यकथा लिहिल्या. तर अवघ्या काही हजार रुपयांच्या मानधनावर पत्रकारिता केली. त्यामुळे गाठीशी कसलीच गुंतवणूक नाही. आज त्यांना दिवस ढकलण्यासाठीही रेशनिंगच्या तांदळाची वाट पाहावी लागते. दैनिकांच्या साप्ताहिक आवृत्तीतील लघुकथांच्या माध्यमातून नाईक यांच्या लेखनाला सुरवात झाली. सत्तरच्या दशकात शंभरहून अधिक लघुकथांनी त्यांनी वाचकांना आपलंसं केलं. दै. "गोमन्तक'च्या साहाय्यक संपादकपदाची धुरा सांभाळत असतानाच नाईक यांचा लेखनाचा प्रवास सुरू झाला. त्यांनी 1970 साली प्रकाशक सदानंद खाडीलकरांना "मृत्यूकडे नेणारे चुंबन' ही पहिली रहस्यकथा दिली. या कथेने प्रकाशकांनाही भारावून सोडलं आणि मराठीतील नव्या रहस्यकथांचा प्रवास सुरू झाला. लष्करातील जगण्याचं आकर्षण, दोन सख्ख्या भावांच्या जगण्यातील अनुभव यांच्या आधारावर "कॅप्टन दीप'चा नायक जन्माला आला. हा "कॅप्टन दीप' तत्कालीन युवा पिढीचा आदर्श ठरला. सत्तरच्या दशकातील शास्त्रज्ञांच्या मृत्यूचे गूढ या कादंबरीपासून 2009 साली आलेल्या "स्वर्ग आणि नरक' या कादंबरीपर्यंत गुरुनाथ नाईकांच्या लिखाणाने वाचकांचं कल्पनाविश्‍व व्यापून टाकलं. चौकट पोतुर्गिजांच्या जुलूमाने विस्थापित कुटुंब गुरुनाथ नाईक मूळचे विठ्ठलापूरचे राणे. पोर्तुगिजांकडून धर्मांतराच्या भीतीने कुटुंबाने गोवा सोडला. तरी आजोबा पोर्तुगिजांकडूनच मारले गेले आणि आजीने पुन्हा गोवा गाठला. साखळीमध्ये नाईक यांच्या आजीचे घर आहे. पण तेही स्वतःच्या नावावर नसल्याने त्यांना हक्क सांगता येत नाही. महाराष्ट्र आणि गोव्याच्या साहित्य सेवेत तब्बल चाळीसहून अधिक वर्षे नाईक यांनी योगदान दिले. पण दोन्ही पैकी एका तरी सरकारला आपली दया येईल, या आशेवर ते जगत आहेत.
.................
त्यांच्या लिखाणाने वाचकांच्या पिढ्या घडवल्या. युवा वर्गाचं पुस्तकांशी नातं जोडलं. तब्बल 1208 कादंबऱ्या लिहीत लिम्का बुकात मराठीची पताका फडकवली. पण साहित्याचा डोंगर उभा करणारे गुरुनाथ नाईक आज अन्नासाठी मोहताज झालेत. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकात लाखोंच्या संख्येने चाहते असणारा हा लेखक केवळ उपेक्षेचा धनी ठरला आहे. रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक यांची व्यथा...


.....................................

गुरुनाथ नाईक यांना मदत करण्यासाठी .
गुरुनाथ विष्णू नाईक -स्टेट बैंक आफ इंडिया -शाखा पणजी -खाते नंबर -31180667793 . 
आवशकता लागल्यास अनिल पाटील (पणजी) यांना फोन करू शकता -9422042054 / 9405921771