>> जय महाराष्ट्र अपडेट : एंकर जयराम पुरी आणि अश्विनी जाधवसह आशिष राणे यांचा राजीनामा... मोठ्या काँस्ट कटिंग नंतरही राजीनामा सत्र सुरु... >> बेरक्याला माहिती देण्यासाठी ई - मेल करा - berkya2011@gmail.com

गुरुवार, १८ डिसेंबर, २०१४

'शेतक-यांची बोगस बोंब` वरुन विधानसभेत सर्वपक्षीय 'बोंब'..

नागपूर  - शेतीला काळी अाई शब्दाचा वापर शेतकरी भावनेतून वापरतो. शेतक-यांना हीन ठरवणारे लेखन कदापी सहन केले जाणार नाही. स्त्रीधनाचा उल्लेख देखील अनुचित असून अडचणीतील शेतक-यांना धीर देण्याएेवजी नाउमेद करणे कोणीही सहन करणार नाही असे सांगत सर्वपक्षीय दै. लोकसत्तामधील `शेतक-यांची बोगस बोंब` या अग्रलेखाचा निषेध केला.
विधानसभेत काल (ता.१८) प्रश्नोत्तराच्या तासानंतर पारनेर (जि. अ.नगर) चे अामदार विजय अौटी यांनी हा मुद्दा उपस्थित केला.
राष्ट्रवादीचे अामदार जितेंद्र अाव्हाड यांनी संपादकीय लेखावर स्थगन प्रस्ताव दाखल केला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखाचा निषेध करत ही भाषा शेतक-याला हीन दाखवण्याची असून
संकटात सापडलेल्या शेतक-यांला अागीत तेल अोतण्याचा प्रकार अाहे. शेतक-याला संकटात धीर देण्याची गरज असून
माध्यमांच्या चौथ्या स्तंभाने जबाबदारी अोळखून पुढे जायला पाहीजे अशी भुमिका मांडली.
अा. जितेंद्र अाव्हाड म्हणाले, समाजातील एका वर्गाला शेतकरी कायम गुलाम राहावा असे वाटते.
शेतक-यांची लक्तरे काढण्याचा हा प्रकार असून पक्षीय अभिननिवेश बाजूला ठेवून काळ्यात मातीत जन्मलेल्या प्रत्येकाने याचा
निशेष केला पाहीजे असे सांगितले.
अा. विजय अौटी म्हणाले, संपादकीय भाषा संसदीय नाही. काळी अाई शब्द शेतकरी भावनेतून वापरतो. त्याची चेष्टा करण्याचा
प्रयत्न केलाय. अडचणीतील शेतक-याला सरकारने पॅकेजच्या रुपाने पाठींबा दिला.
त्याची टिका करण्याचा अधिकार यांना कुणी दिला. लोकसत्ताचे संपादक गिरीष कुबेर यांच्या
नावाचा उल्लेख करत अा. अौटींनी शेतकरी राजकीय दृष्ट्या सक्षम असतो तर संपादकांच्या
पोटात का दुखते असा सवाल उपस्थित केला.
राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या संपादकीय लेखाचा निषेध करत सभागृहाच्या नेत्यांनी भुमि्का स्पष्ट करण्याची मागणी केली.
अामदार गुलाबराव पाटील म्हणाले, संपदकीय लेखातून शेतक-यांची लक्तरे काढली. शेतकरी
७ जूनला धुळपेरणी करतो अाणि अाकाशाकडे पाहतो. पाऊस अाला नाहीतर बियाणे वाया जाते.
ही पेरणी म्हणजे लॉटरी अाहे. लागली तर लागली. हे लक्षात ठेवा शेतकरी राहीला नाही तर `लोकसत्ता` चालणार नाही.
हा अग्रलेख शेतक-यांचा अपमान अाहे. शेतक-यांचा अपमान सहन केला जाणार नाही.
अा. अाशिष शेलार यांनी व-त्तपत्र स्वातंत्र्याची मर्यादा असल्याचे सांगत दुस-यांच्या स्वातंत्र्यावर गदा येता कामा नये असे सांगितले. सदर वृत्तपत्राला पाठवलेल्या उत्तरात
शब्दाच बदल केल्याचे त्यांनी सांगितले.
छगन भुजबळ यांनी शेतक-यांची बॅंकाची खाती तपासा- कर्जबाजारी कसे अाहेत हे समजेल.
दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक अाले. शेतकरी ढसाढसा रडतोय. शेतकरी गेली पाच वर्ष निसर्गचक्रापुढे हतबल झालाय.
मदतीचे पॅकेज जाहीर करणे मुर्खपणा असून संपादकाने मिडीयावर शरसंधान केल्याचे भुजबळ म्हणाले.
-------------------
वातानुकुलीत यंत्रणेत बसून केलेले लिखान ः बाळासाहेब थोरात
लोकसत्ताचा अग्रलेख दुर्देवी अग्रलेख असून दुष्काळात गारपीटीचे संकट शेतक-यावर कोसळले असताना
शेतक-याला मदतीचे धोरण सरकारचे अाहे. स्वतः मुख्यमंत्री शेतात जाऊन परीस्थिती पाहीली अाहे.
मुंबईत एसीमध्ये बसून महाराष्ट्राच्या परीस्थितीचा अंदाज करुन भाष्य करणे अत्यंत चुकीचे अाहे.
संपादकांनी गावात बसून संपादकीय लिहीले असे तर त्यांना वेदना कळाल्या असत्या. शेतक-यांकडील
दागीने हे त्यांच्या अाया- बहीनींचे दागिने स्त्रीधन असते. कुटुंब अडचणीत असताना स्त्रीधन विकून किंवा
गहान ठेऊन गरज भागविली जाते. याचा उल्लेख करने योग्य नाही.
-----------------
जितेंद्र अाव्हाड ः हा प्रकार शेतक-यांची टिंगल टवाळी करण्याचे पाप अाहे.
अाईची टिंगळ टवाळी केली अाहे ते पाप अाहे. शेतीसाठी कर्ज कुठून घेतले ते कृषी सेवा केंद्रावर जाऊन चौकशी करा.
दुष्काळामुळे अनेकांनी गावे सोडली स्थलांतरीत झाले. शेतक-यांचे उत्पन्न कष्टाचं देणं अाहे.
कष्टाचा घाम अाहे. अशा लेखकांना धडा शिकावयला हवा.
-------------------
शेतक-याला हीन दाखवण्याची संपादकीय भाषा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्टाने वृत्तपत्र स्वातंत्र्यावर कधीही घाला घातला नाही. स्वातंत्र्याच्या मर्यादा संविधानाने स्पष्ट केल्यात. त्यानुसार दुस-याच्या स्वातंत्र्यावर गदा अाणता येत नाही.
राज्यातील शेतकरी सातत्याने अडचणीत अाहे. शेतकरी अात्महत्या होत अाहेत. स्वखुशीने कोणीही अात्महत्या करत नाही. वाईट परीस्थिती अाणि निराशेमुळे जीवन संपण्याची वेळ येते.
जगण्याचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतरच शेतकरी अात्महत्या करतो. अशा परीस्थितीत शेतक-याला धीर दिला पाहीजे.
त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहीले पाहीजे. निराशेतून बाहेर ये ही भावना शेतक-यापर्यंत पोचली पाहीजे.
राजकारण्यांवर केलेली टीका अाम्ही सहन करु. राज्यातील संकटग्रस्त शेतक-यांवर टीका करणे उचित नाही.
शेतक-याला हीन दाखवण्याची भाषा असून एकप्रगारे अागीत तेल अोतण्याचा प्रकार अाहे.
या भाषेचा सर्वच स्तरातून निषेध झाला पाहीजे. विधानसभा सभागृहातून ही भावना जावी अाणि
चौथ्या स्तंभाने जबाबदारी अोळखून यापुढील काळात पुढे जायला पाहीजे.
---------------
५ एकर जिरायत शेती पिकवून पत्नीच्या अंगावर सोने चढवून दाखवा ः अा. विजय अौटीचे अाव्हान
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मी माझी स्वतःची ५ एकर जिरायती शेती देतो.
त्याने ही शेती करुन दाखवावी. अाणि त्यांच्या पत्नीच्या अंगावर सोने घालून दाखवावे असे अाव्हान त्यांनी दिले.

गिरीश कुबेर यांना खुले पत्र ...प्रति,
श्री. गिरीश कुबेरजी

स.न.
१६ डिसेंबरच्या ‘लोकसत्ता’ मध्ये आपण लिहलेले ‘बळीराजाची बोगस बोंब’ हे संपादकीय वाचले. संपादक गिरीष कुबेर यांच्या स्टंटबाजीचा हा भाग आहे, असे माझे प्रामाणिक मत आहे. अनेकदा अकारण वाद निर्माण करून, स्वत;कडे लक्ष वेधून घेण्याचा आपला प्रयत्न असतो. आताचा हा अग्रलेख याच रणनीतीचा भाग असावा. अन्यथा अर्थशास्त्राचा अभ्यासक म्हणून स्वत:ची ओळख सांगणा-या आपल्यासारख्या संपादकाने एवढे बिनबुडाचे व पोरकटपणाचे लेखन करावे हे पटत नाही. हा अग्रलेखच असा आहे की, शेतक-यांच्या प्रश्नाशी संबंधित प्रत्येकाला याची दखल घ्यावीच लागते. या अर्थाने गिरीष कुबेरजी आपण ‘व्हिलन’ च्या रुपात का होईना, सर्व मिडीयात, विधीमंडळात गाजत आहात. एका दृष्टीने आपला चमकण्याचा हेतू सफल झालेला दिसतो.
मुळात कोणत्याही वृत्तपत्राला व त्याच्या संपादक, मालकाला शेतक-यांबद्दल प्रेम असण्याचे कारण नाही. कारण शेतकरी हा त्यांचा ग्राहकच नाही. वृत्तपत्र विकत घेऊन वाचणारे कोणी शेतकरी असतील तर, ते नक्कीच बडे शेतकरी असले पाहिजेत. जाहीरातीचा व्यवसाय शेतक-यांकडून मिळण्याची अजिबात शक्यता नाही. बहुतेक वृत्तपत्र मध्यवमर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, नोकरदार हेच विकत घेऊन वाचतात. त्यामुळे वृत्तपत्र याच वर्गाच्या मानसिकतेचं प्रतिनिधीत्त्व करतात. ‘बळीराजाची बोगस बोंब’ या अग्रलेखात याच मानसिकतेचं जागो-जागी प्रतिबिंब दिसतं. संपादकीयाची सुरुवात करतानाच आपण नोंदवतात, ‘शेतकरी म्हटला की, तो गरीब बिचारा असायलाच हवा आणि तो नाडला जाणारच वा गेलेला असणारच असे मानण्याची प्रथा आपल्याकडे चांगलीच रूढ झाली आहे.’ हे विधान वेड पांघरून पेडगावला जाणारे आहे. कारण जे जळजळीत वास्तव आहे त्याला आपण प्रथा म्हणून दुर्लक्षू इच्छिता. मराठवाड्यातील कुठलंही एक गाव आपण निवडावं आणि शेतीवर अवलंबून असणा-या शेतक-यांची नेमकी काय परिस्थिती आहे ते डोळ्यांनी पाहावं म्हणजे आपल्याला नक्कीच स्वत;च्या विधानाची कीव करावी वाटेल. पुढे आपण नोंदवता, ‘शेतकरी प्रत्यक्षात लुटला गेलेला असो वा नसो. शेतकरी लुटण्यासाठीच असतात आणि आपण प्रत्येकजण त्या लुटीस हातभार लावण्याचेच काम करीत असतो, हा समज असतो.’ हा समज नाही तर हे वास्तव आहे. शेतीसाठीच्या बियाणे, खतापासून जी शेतक-यांची लूट होते, ती बाजारात माल आणेपर्यंत. आपला माल उत्पादीत करणारा प्रत्येक उत्पादक त्याच्या मालाची किंमत स्वत: ठरवत असतो. खर्चामध्ये नफा मिसळूनच ही किंमत ठरते. मात्र शेतीमालाच्या बाबतीत शेतक-यांच्या हातात काहीच नाही. कधीतरी चांगले पैसे मिळण्याची परिस्थिती तयार होते तेव्हा सरकार त्या शेतीमालाची आयात करुन भाव पाडते. हा वर्षानुवर्षांचा अनुभव आहे. कांदा भावाबद्दल ओरड करणारे सगळे मध्यम-उच्चवर्गीय शेतक-यांचे शत्रूच आहेत आणि शेतक-यांच्या लुटीत ते सर्वजण अप्रत्यक्षपणे सहभागी होतात हे वास्तव आहे. अनेक दशकांपासून चालू असलेली शेतक-यांची ही लुटमार अर्थतज्ज्ञ असणा-या आपल्यासारख्या विद्वानाला दिसत नाही असे थोडेच आहे? मात्र आपण जाणीवपूर्वक वेडेपणाचे हे सोंग घेतले आहे.
शेती हा किती जोखमीचा धंदा आहे, याचे सामान्यज्ञान आपल्यासारख्या अभ्यासू संपादकाला असू नये याचे आश्चर्य वाटते ! केवळ कोरडवाहू शेतीचा विचार केला तर, बियाणे, खते व कीटकनाशके यापासून फसवणूक सुरू होते. पेरणीसाठी आवश्यक असणा-या या वस्तु कधी चढ्या भावाने मिळतात तर कधी त्या बोगस मिळतात. बोगस बियाणे उगवत नाही तेव्हा वृत्तपत्रात बातम्या येतात पण प्रत्यक्षात किती जणांना नुकसानभरपाई मिळते? किती व्यापा-यांवर कारवाई होते? याचे उत्तर ‘नाही’ असेच मिळते. बियाणे न उगवल्याची किती मोठी किंमत त्या शेतक-याला मोजावी लागते, हे आपल्याला कसे कळणार? बियाणे पेरले तर त्याला वेळेवर व पुरेसा पाऊस पडावा लागतो. पाऊस पुरेसा झाला नाही तर, चिमण्या, कावळे, मोरं हे बियाणे उकरून खातात. गेल्या खरीप पेरणी हंगामात अचानकपणे गोगलगार्इंची प्रचंड प्रमाणात पैदास झाली. त्यांनी हजारो हेक्टरवरील बियाणे खाऊन फस्त केली. शेतक-यांना आधी या गोगलगाई मारण्याची मोहीम हाती घ्यावी लागली व दुस-यांदा पेरणी करावी लागली. याला काही सरकारने मदत केली नाही. जिथे एकदाच दर्जेदार बियाणे मिळण्याची खात्री नाही तिथे दुस-यांदा पेरणी करण्यासाठी बियाणे मिळवताना शेतक-यांचे काय हाल झाले असतील? याची कल्पना आपल्यासारख्या बाबुला कशी येणार? उगवण नीट झाली म्हणजे पीक हातात आले असे नाही. पीकाच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर रोगराईचे आक्रमण असते. त्याला नियंत्रणात आणण्या-साठी फवारणी करावी लागते. शिवाय प्रत्येक टप्प्यावर पाऊस पडावा लागतोच. बहुतेकदा वेळ चुकवून पाऊस पडतो. त्यामुळे उत्पादनात घट होते. कधी सोयाबिन काढणीच्या वेळी अतिवृष्टी होते, त्यामुळे मोठा फटका बसतो तर एखादा अवकाळी पाऊस पांढ-या शुभ्र ज्वारीचे रुपांतर काळ्या ज्वारीत करतो. अवर्षण, अनियमितता, अतिवृष्टी, वादळ, गारपीट ही संकटं नेहमी अचानकपणे उद्भवतात. एका तासात होत्याचे नव्हते होते. शेतीत ही जोखीम क्षणाक्षणाला आहे. याशिवाय उंदीर, मोरं, वानरं, रान-डुक्कर असे अनेक पशु-पक्षी हे आपापल्या परीने शेतीचे नुकसान करीत असतात. शेतकरी म्हणून हे त्याला आनंदाने सहन करावेच लागते.
‘होत्याचं नव्हतं होणं’ म्हणजे काय?हे आपल्याला कळण्याचं कारण नाही. दु:ख, दैन्य, दारिद्र्यता, पराधिनता, विवशता व लाचारीचा अनुभव हा फक्त शेतक-यांच्याच वाट्याला येतो. अंगावर दागदागिने घालून मिरवणारे शेतकरी आपण कुठे पाहिले आहेत, हे मला माहित नाही. पण दैन्यावस्थेत जगणारे, आजही मिरचीबरोबर भाकरी खाणारे, पायात प्लॅस्टिकचा बुट घातलेले किंवा नागड्या पायाचे, कळकट कपडे घातलेले व कसे-बसे आयुष्य ओढत चाललेले शेकडो शेतकरी मी आपल्याला गावोगाव दाखवू शकतो. त्यांच्या आयुष्यात जगणं हीच फक्त चैन आहे. ज्या बागायतदार शेतक-यांवर आपण तोंडसुख घेतले आहे, ते शेतकरी दरवर्षी किती मोठी जोखीम घेऊन शेती करतात, याची आपल्याला कल्पना नाही. पाच-पंचवीस लाखाची बाग उद्धवस्त होणा-या शेतक-याला हेक्टरी पंचवीस हजाराची मदत मिळते, हे वास्तव आपल्याला माहित नाही, असे थोडेच आहे. तरीही आपण धनदांडगे म्हणून त्यांना अवमानित करताय, ही नेमकी कुठली पत्रकारिता आहे? कुठल्या तरी मूठभर राजकारणी बागायतदारांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेऊन आपण हे बोलत असाल तर स्वत:चीच फसवणूक करुन घेत आहात. तीन-चार वर्षे जीवापाड जपलेल्या बागेला गारपिठीचा फटका बसतो, लाखोचं नुकसान होतं, बाग नष्ट होते तेव्हा कुबेरसाहेब, त्या शेतक-याचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा असतो. कॅमेरा दिसला म्हणून नाटक करायला शेतकरी काही सिनेकलाकार नाहीत !
कुबेरसाहेब आपण अर्थतज्ज्ञ आहात. इतर व्यावसायिकाइतकेच शेती व्यवसायातही धोके आहेत असे म्हणता. असे मोघम विधान करु नका. शेतीइतकी जीवघेणी जोखीम असणारे कोणकोणते व्यवसाय आहेत त्याची यादी द्या. कोणता व्यवसाय अवर्षणाने, अतिवृष्टीने, वादळाने, गारपिटीने, रोगराईने संपूष्टात येतो ते सांगा? शेतक-यां-एवढी फसवणूक कोणत्या व्यावसायिकांची होते ते सांगा? शेतक-यांच्या कर्जमाफीबद्दल आपण वारंवार गळा काढताय, स्वत: अर्थतज्ज्ञ आहात. आकडेवारीने सांगा की, आतापर्यंत शेतक-यांना किती वेळा आणि किती रकमेची कर्जमाफी दिली व उद्योजकांना किती कर्जमाफी दिली. तेही सांगा. उद्योजकांची कर्जमाफी आणि शेतक-यांची कर्जमाफी याची तुलनात्मक आकडेवारी द्या पण आपण हे करणार नाही. कारण इथे तुमचे ढोंग उघडे पडते. शेतक-यांना फक्त एक-दोन वेळा कर्जमाफी दिली आहे ती ही ठराविक दहा-पंधरा हजाराच्या रकमेपर्यंतची. दुष्काळसदृश्य परिस्थिती म्हणून सरकारने कर्जावरील व्याजमाफी दिली आहे.त्यामुळेही आपल्या पोटात दुखते आहे. परंतु ५० हजारांपर्यंतचे शेतीसाठीचे कर्ज व्याजमूक्त असेल अशी घोषणा यापूर्वीच्या सरकारनेच केली होती. तेव्हा शेतक-यांच्या नेमक्या कोणत्या कर्जाला व्याजमाफी मिळणार? वीजबीलाच्या माफीचेही असेच गौडबंगाल आहे. मुळातच शेतीसाठीची वीज पाच-सहा तास मिळते. प्रत्यक्षात वीजबिल आकारणी मात्र चोवीस तासाची होते. दुष्काळामुळे आधीच पाणीटंचाई त्यात वीजमोटारीचा वापर तो किती होणार? वीजेचे बील तरी किती असणार? पण आपल्याला मात्र ही वीजबीलमाफी म्हणजे शेतक-यांसाठी असलेली मेजवानी वाटत असावी.
शेतक-यांच्या आत्महत्येचा मुद्दा आपण अतिशय कोडगेपणाने मांडला आहे. आपण केलेली तुलना चुकीची व गैरलागू आहे. शेतकरी आत्महत्येची धमकी देत नाहीत तर तो आत्महत्या करतोय. गेल्या ८-१० वर्षात देशभरातील लाखो शेतक-यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाच्या कारणावरून आत्महत्या केल्या आहेत. केंद्रात आणि राज्यात सत्ता बदल होऊनही या आत्महत्या सुरूच आहेत. पुरोगामी महाराष्ट्र यात आघाडीवर आहे. आपण म्हणता त्याप्रमाणे, इतर व्यवसायातही शेती-इतकेच धोके असतील तर इतर कोणत्याही उद्योग व्यवसायात अपवादानेही आत्महत्या का होत नाहीत? आपल्या दृष्टिप्रमाणे, शेती हा श्रीमंतीचा व चैनीचा व्यवसाय असेल तर करोडो शेतकरी शेतीतून का बाहेर पडत आहेत? दिवसेंदिवस शेती का ओस पडत आहे? शेतीसाठी मनुष्यबळ का उपलब्ध होत नाही? शेतक-याच्या घरातला मुलगा शेती करायला का तयार नाही? याची उत्तरं आपण कधी शोधली आहेत का? ती शोधली असती तर ख-या अर्थानं आपण शेतीप्रश्नाची चिकीत्सा करू शकला असता. परंतु.....
लेखाचा समारोप करताना आपण वापरलेली भाषा आपल्या शेतक-यां-विषयीच्या विकृत मनोवृत्तीची द्योतक म्हणावी लागेल. ‘कथित बळीराजाचे खरे अश्रू कोणते अन् बनावट कोणते हे शोधण्याचा प्रामाणिकपणा सरकारने दाखवावा आणि नुकसान भरपाया आणि कर्जमाफ्या जाहीर करीत हिंडायची प्रथा बंद करावी. स्वतःच्या मुर्खपणामुळे कोणत्या तरी जत्रेत चेंगराचेंगरी होऊन कोणी गेले दे आर्थिक मदत. वादळात, गारपिटीत पीक पडले रे दे आर्थिक मदत, ही प्रथा भिकेला लावणारी आहे. ज्यांना ती पाळायची आहे त्यांनी स्वतःच्या खिशातून मदत देऊन पाळावी या कथित बळीराजाची बोंब देखील बोगस असू शकते हे मान्य करण्याचे धैर्य सरकारने दाखवावे आणि जनतेचा पैसा वाया घालवणे थांबवावे.’ ही आपली भाषा अत्यंत उद्दामपणाची व अहंकारी आहे. शेतक-यांना पुन्हा पुन्हा कथित बळीराजा म्हणून हिनवण्याचे धाडस आपल्यासारखा शेतकरी-द्वेष्टाच करू शकतो. शेतकरी हा काही स्वतःला बळीराजा म्हणवून घेत नाही. राजा म्हणवून घेण्याची त्याची ऐपतही नाही. त्याच्याच जीवावर जगणारी सगळी बांडगूळं मात्र राजासारखी जगतात. आपणही एक बांडगूळच आहात. शेतकरी एका दाण्यापासून हजार दाण्याची निर्मिती करतो. काळ्या मातीतून नवं उत्पादन काढतो. यासाठी तो अहोरात्र कष्ट घेतो. पैसा निर्मिती तर शेतकरीच करतो. शेतक-यांनी शेती सोडली तर आपली ही सगळी बांडगूळी व्यवस्था संपायला फारसा वेळ लागणार नाही.
वादळ,गारपीट, अतिवृष्टी व अवकाळी पाऊस शेतक-यांच्या मुर्खपणामुळे येत नाही. या आपत्तीशी शेतक-याचा काहीही संबंध नाही. ही नैसर्गिक आपत्ती आहे. या आपत्तीत शेतक-यांना मदत करणे हे लोकशाहीतील प्रत्येक सरकारचे कर्तव्य आहे. भारतातच नाही तर जगभरात अशा आपत्तीत शेतक-यांना ते-ते सरकार मदते. याची आपल्याला माहिती नसावी हे ही एक आश्चर्यच. अशा आपत्तीत शेतक-यांना मदत करू नये असे म्हणणे म्हणजे सरळसरळ शेतक-यांना शेती व्यवसाय सोडा म्हणून सांगण्यासारखे आहे. हे परवडणारे आहे काय? याचा सरकारने जरूर विचार करावा. खरे शेतकरी कोणते? खोटे कोणते? कथित बळीराजा कोणता? याचा शोध कुबेरसाहेब आपल्यासारख्या ख्यातनाम पत्रकारांनी नक्कीच घ्यायला हवा. मात्र आपल्या लेखणीची खाज जिरवून घेण्यासाठी मिळून मिळून आपल्याला बिचारा शेतकरीच मिळावा हे आपले दुर्दैवच ! अस्मानी आणि सुलतानी संकटाने जो आधीच मरून पडलाय त्याचं आणखी काय उघडून बघणार? आपल्यासारख्या वृत्तींच्या लोकांमुळे जर शेती व्यवसाय संपलाच तर आपल्याला लोकसत्तेची पानं खाऊनच जगावं लागेल ! आपण पत्रकार आहात. लोकसत्तेसारख्या वृत्तपत्राचे संपादक आहात त्यामुळे महान आहातच ! प्रत्येक विषयाप्रमाणे शेतकरी व शेतीची चिकीत्सा करण्याचा आपल्याला अधिकार आहेच. तशी ती व्हायलाही हवी. मात्र आपला हेतू चिकीत्सा करण्याचा नाही तर शेतक-यांची टिंगल-टवाळी करण्याचा, त्यांना अप्रामाणिक, खोटारडे ठरवण्याचा, सरकारकडून अनुदान लाटून मजा करणारे, खोट्या दुःखाचं भांडवल करणारे आहेत असे दाखवण्याचा आहे. त्यामुळेच आपण शेत-क-यांबद्दल अत्यंत सवंग, बालिश विधाने केली आहेत. निरुपाय म्हणून, नैराश्यग्रस्त बनून आत्महत्या करणा-या शेतक-यांची खिल्ली उडवली आहे. प्रत्येक सजीवाला आपला जीव सर्वात प्रिय असतो. माणसांना तर जीवापेक्षा दुसरे काहीच प्रिय नसते. असे असताना लाखो शेतकरी सरकारी मदत लाटण्यासाठी आत्महत्या करताहेत असे आपल्याला वाटणे हेच आपल्या विकृत बुद्धीचे लक्षण आहे. आत्महत्या करणा-या शेतक-याच्या जागी आपण स्वतःला कल्पिला असतात तर असा आगाऊपणा करण्याचे धाडस आपल्याला झाले नसते. वृत्तपत्र मोठे असते म्हणजे त्याचा संपादक मोठा असतोच असे नाही. उलट अनेक कद्रुही अशा पदावर जात असतात हेच आपण या लेखनाने दाखवून दिले आहे. शेतक-यांबाबतची एवढी असंवेदनशीलता माझ्या पाहण्यात यापूर्वी आलेली नाही.
एक शेतकरी म्हणून मी आपल्या या लेखनाचा जाहीर निषेध करतो ! आपण शेतकरीद्वेष्टे आहात याची खात्री पटली असल्यामुळे आपण संपादक असेपर्यंत मी ‘लोकसत्ता’ हा पेपर हातातही धरणार नाही. मला माहित आहे यामुळे आपल्याला काही फरक पडणार नाही. पण निषेध करण्याचा एवढाच मार्ग माझ्यापुढे शिल्लक आहे.
...........................
- महारूद्र मंगनाळे
लातूर
मो.9422469339

* महारूद्र मंगनाळे हे महाराष्ट्र टाइम्स आणि चित्रलेखाचे माजी प्रतिनिधी असून,सध्या त्यांचे बातमी मागची बातमी नावाचे साप्ताहिक सुरू आहे.त्याचबरोबर त्यांनी आधुनिक शेती सुरू केली आहे
Maharudra Mangnale

बोगस बोंब मारायला आमचा 'बळीराजा' कुबेर नाही...

‘बळीराजाची बोगस बोंब ’ या नावाचा हाग्रलेख लिहून तमाम शेतकऱ्यांच्या भावना दुखावणाऱ्या फेकसत्ता आणि गिरा कुबेरचा आज विधानसभेत आ.जितेंद्र आव्हाड यांच्या सहित सर्व पक्षीय आमदारांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ.जितेंद्र आव्हाड व शिवसेनेचे आ.विजय औटी यांनी या हाग्रलेखाच्या निषेधाचा प्रस्ताव मांडला होता. यावेळी बोलताना आ.जितेंद्र आव्हाड म्हणाले मंगळवार दि.१६ डिसेंबर रोजी एका वृत्तापत्रातून ‘ बळीराजाची बोगस बोंब ’ या नावाने बोगस अग्रलेख प्रसिध्द करुन दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीटीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम या दैनिकाच्या संपादकाने केले आहे. या अग्रलेखात शेतकऱ्यांसंदर्भात चुकीची व खालच्या स्तराची भाषा वापरली गेली असून ही भाषा निषेधार्ह आहे. या संपादकाने राज्यातील बळीराजाची वस्तूस्थिती डोळ्यासमोर न ठेवता हा अग्रलेख लिहला आहे. अशा प्रकारचा अग्रलेख लिहून या दैनिकाच्या संपादकाने गोरगरिब शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. आमचा बळीराजा ज्या मातीत आपली शेती पिकवितो त्या मातीला तो आपली‘काळी आई’ मानतो. त्या आमच्या काळ्या आई विषयी देखील या संपादकाने चुकीची भाषा वापरली आहे. आमचा बळीराजा गरीब असून तो सावळ्या विठूरायाची पूजा करतो. तो श्रीमंत वर्गाचा देव असणाऱ्या कुबेराची पूजा तो करीत नाही. सध्या दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीटी मुळे शेतकऱ्याची अवस्था ही दयनीय अशी झाली आहे.त्यामुळे सत्ताधारी-विरोधक,माध्यमे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नी गंभीर आहेत ते शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या करीत आहेत.परुंतु सध्या विशिष्ट वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कुबेर भक्तांना हे शेतकऱ्यांचे हित पाहवत नसल्यानेच अशा प्रकारचे अग्रलेख लिहून ते आमच्या गोरगरिब शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम करीत आहेत. या दैनिकाच्या संपादकाने शेतकऱ्यांची बाजू मांडणाऱ्या इतर माध्यमांना ,राजकीय नेत्यांना देखील मुर्ख ठरविले आहे.अशा प्रकारचे लिखाण निषेधार्ह असून मी या अग्रलेखाचा निषेध करतो.
शिवसेनेचे आ.विजय औटी यांनी या संपादकाला आपली पाच एकर जमीन कसण्यासाठी देऊ या संपादकाने आपली जमीन कसून बायका-मुलांना सोन्यानं मडवून दाखवावं असं आव्हान दिलं. या अग्रेलखाचा राधाकृष्ण विखे-पाटील, आ.छगन भुजबळ, आ.आशिष शेलार,बाळासाहेब थोरात यांनी देखील तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. शेवटी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाची भावना लक्षात घेऊन अग्रलेखाच्या संपादकाचा निषेध करीत यापुढे अशा प्रकारे लेखन वृत्तपत्रातून होणार नाही याबाबत सूचना केल्या

बुधवार, १७ डिसेंबर, २०१४

फेकसत्ताच्या हाग्रलेखावर 'प्रहार'

नाव कुबेर,विचार दरिद्री !
............................
आपण आजचा लोकसत्ता वाचला का ? वाचला असाल तर त्यातील संपादकीय वाचून तळपायाची आग मस्तकाला जाईल.
कुबेर नावाच्या दरिद्री माणसाने शेतकऱ्यांवर तोंडसुख घेतलय.ज्यांना शेती म्हणजे काय,हे माहीत नाही,त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा तर काय करणार म्हणा...
मुंबईच्या एअरकंडिशन ऑफीसमध्ये बसून अग्रलेख नव्हे हाग्रलेख लिहिणाऱ्या कुबेरांना जरा महाराष्ट्रात फिरवा...त्यांना मराठवाडा आणि विदर्भातील शेती दाखवा.आमच्या शेतकरी बांधवाची दु:खे काय आहेत,हे त्यांना सांगा आणि त्यांना वस्तुस्थितीचे भान नाही आल्यास त्यांच्या खांद्यावर बैलाऐवजी जू देवून शेतात जुंपा...
या कुबेराचा आणि त्यांच्या फेकसत्ताचा मी नुसता निषेधच नव्हे तर धिक्कार करतो....

या कुबेराला सर्व आत्महत्याग्रस्त समोर येणारे शेतकरी बागायतदार दिसताहेत! (त्यांनी चक्क तसे लिहिलेय)
विदर्भ आणि मराठवाड्यातील सुमारे ८५ टक्के शेती क्षेत्र जिरायती आहे. पावसाच्या पाण्यावर या शेतीचे भवितव्य अवलंबून आहे. सिंचनाच्या सर्व पर्यायांचा अवलंब केला तरी राज्यात ३५ ते ४० टक्क्यांच्या वर सिंचन क्षमता जाऊ शकत नाही; हे या शहरी पत्रकारला कोण सांगेल?
आजचा 'लोकसत्ता'चा अग्रलेख म्हणजे खेड़े न पाहिलेल्या शहरातील विकृत माणसाने केलेली भंपकगिरी आहे। हे कधी शेतावर गेलेत का शेतीला धंदा म्हणायला!
इतकी लेखणी परजायची तर अदानीवर त्या मोदीने उधळलेल्या कर्जावर लिहा की!
फेकसत्ताकारांनी शेतकऱ्यांना बोगस ठरवल्यानंतर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.बेरक्यानेही याबाबत आवाज उठवला.आता राज्यातील सर्वच वृत्तपत्र खडबडून जागे झाले आहेत.
प्रहार,सकाळ,लोकपत्र,लोकनेतासह छोटी मोठी दैनिके फेकसत्ताचा चांगलाच समाचार घेत आहेत...

............................................

फेकसत्ताच्या हाग्रलेखावर 'प्रहार'
.......................................
फेकसत्ताकारांनी शेतकऱ्यांना बोगस ठरवल्यानंतर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.बेरक्यानेही याबाबत आवाज उठवला.आता राज्यातील सर्वच वृत्तपत्र खडबडून जागे झाले आहेत.
प्रहार,सकाळ,लोकपत्र,लोकनेतासह छोटी मोठी दैनिके फेकसत्ताचा चांगलाच समाचार घेत आहेत...

....................................................................
prahaar
बोगस’ कोण? ‘बोंब’ कोणाची?
(अग्रलेख)
...................................
गेल्या ५० वर्षात महाराष्ट्रातल्या कष्टकरी शेतक-याने जवळपास १६ वर्षे आलेले दुष्काळ, सात ते आठ वेळा आलेले महापूर, दुष्काळामुळे झालेली नापिकी आणि महापुराने उभे पीक वाहून गेल्यामुळे झालेले नुकसान, अशा अनेक आपत्तींचा सामना केला त्याच बळीराजाला जे ‘बोगस’ म्हणत आहेत, त्यांच्या घरापर्यंत विनासायास धान्य पोहोचवलेले आहे. ‘बोगस’ म्हणणा-यांच्या मागच्या दोन पिढय़ा रेशनच्या रांगेत दोन-दोन तास उभे राहिलेल्या आहेत. अर्धा किलो ज्वारी आणि अर्धा किलो तांदळासाठी अख्खा महाराष्ट्र रांगेत असायचा. या रांगेत कुबेरही होते आणि गरीबही होते. हातात पाटल्या, बांगडय़ा घातलेल्या पाटील, देशमुखांच्या घरातील भगिनीसुद्घा भीषण दुष्काळामुळे रोजगार हमीच्या कामावर उतरल्या होत्या आणि त्यात या कष्टकरी भगिनींनी कधीही कमीपणा मानला नाही. याच ‘बोगस’वाल्या तत्सम वृत्तपत्राने रोजगार हमीला झोडझोड झोडपले आहे. त्यातले भ्रष्टाचार उघड करण्यात कोणती चूक नव्हती; पण, त्याचवेळी महाराष्ट्रात याच रोजगार हमीतून पाच लाख कामे उभी राहिली. त्या कामांवर कधी पुरवणी काढण्याची ‘आयडिया’ कोणा संपादकाला सुचली नाही. ग्रामीण भागातल्या शेतक-याचे कष्ट काय आहेत, याच्यावरही कधी ‘लोकरंग’ उधळले नाहीत. बोगस बियाणांचा सामना शेतक-याला करावा लागला. मग दुष्काळाचा सामना शेतकरी करतो आहे. सावकारी कर्ज आणि बँकांचे कर्ज अशा अनेक कर्जात गुरफटलेल्या शेतक-याचे कष्ट किती आहेत, सा-या कुटुंबाचे कष्ट किती आहेत, याची वातानुकूलित खोलीत बसून कुणालाही कल्पना येणार नाही.
शेतक-यांच्या कर्जमाफीबद्दल आणि हा ‘बोगस’ शेतकरी कर्जमाफीची बोंब उगाच मारत असल्याबद्दल मुंबईत बसून ठणाणा करणा-यांना, या शेतक-याने गेल्या ५० वर्षात बँकांचे किती हजार कोटी रुपये कर्ज फेडले आहे, याची जरा तरी माहिती आहे का? खेडय़ातला शेतकरी संपन्न झाला की, त्याच्या दारात फटफटी किंवा चारचाकी आली की, जळणारी ही माणसे आणि शेतक-याला बोगस ठरवणारी हीच माणसे! याच पत्रकारितेत काही दैनिके ‘पेड न्यूज’चा बोगस धंदा करून या व्यवसायाची बदनामी करत आहेत तर काही दैनिके कष्टकरी शेतक-याला ‘बोगस’ ठरवत आहेत. काय समजतात स्वत:ला हे?
महाराष्ट्रातला कष्टकरी शेतकरी समजून घ्यायला यांना दहा पिढय़ा लागतील. या शेतक-याने गेल्या अनेक वर्षात या महाराष्ट्राला अन्न-धान्याच्या बाबतीत स्वावलंबी केले. तो तिथे खेडय़ात, शेतात राबतो आहे म्हणून आज शहरातले लोक मिजाशीने वावरत आहेत. शंभर एकर जमीन बाळगणा-या शेतक-यांना कसली माफी देता, असे प्रश्न विचारत आहेत. विषयाची पूर्ण माहिती न घेता लिहिणा-या या बुद्घिमंतांची कीव येते. असे प्रश्न विचारणा-यांना महाराष्ट्रातल्या शेतक-यांचे काय पडले आहे? अडीच ते तीन एकरच्या वर कुणालाही मदत मिळत नाही. ही शेतीच्या कर्जमाफीची किंवा सबसिडीची अनेक दिवसांची नियमावली आहे. शंभर एकरवाल्या किती जणांना सूट आणि सवलत दिली, ते एकदा सांगा ना. सहकारी कारखानदारांवर राग असेल तर तो राग व्यक्त करा. त्यांनी काही चुकीचे केले असेल तर त्यांना झोडपा; पण, महाराष्ट्रातल्या या कृषी, औद्योगिक क्रांतीने किती हजार लोकांना रोजगार दिला आहे, याची माहिती घेण्याकरिता जरा मुंबईच्या वातानुकूलित खोलीतून बाहेर पडून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात एकदा फिरून या. म्हणजे मग ‘आयडिया-एक्चेंज’मध्ये बौद्धिक ऐकून जे वास्तव समजणार नाही, ते आपोआप कळेल.
महाराष्ट्रातल्या कष्टकरी शेतक-याला बोगस म्हणणे, तो बोंब मारतो, असा त्याच्यावर आक्षेप घेणे, हे विकृत बुद्धीचे लक्षण आहे. महाराष्ट्रातल्या कष्टकरी शेतक-याचा एवढा अपमान आजपर्यंत कोणीही केलेला नव्हता. आत्महत्या करणा-या शेतक-याची एवढी टिंगल महाराष्ट्रात आजपर्यंत कोणी केली नव्हती. तुम्हाला या कष्टकरी आणि गरीब शेतक-याला मदत करता येत नसेल तर मदत करू नका. त्याच्या घरातले दु:ख समजून घेता येत नसेल तर घेऊ नका; पण, गप्प बसायला तर तुम्हाला कोणता खर्च नाही ना! किमान त्याच्या दु:खावर डागण्या देऊ नका. ‘बोगस’ म्हणून शिवी घालून त्याला खिजवू नका. नाईलाजाने आत्महत्या करणारा शेतकरी, आपल्या हाताने आपले मरण पाहणारा शेतकरी, समोर त्याच्या घरातली कच्ची-बच्ची असताना तो मृत्यूला कवटाळतो, या मागचे भीषण सत्य समजून घ्यायला काळीज असावे लागते. शहरी पत्रकारिता एवढी मुर्दाड झाली आहे, असे वाटले नव्हते. काळ्या मातीवर प्रेम करून वर्षाचे १२ महिने कष्ट करणा-या शेतक-याला ‘बोगस’ ठरवणारे तुम्ही असे कोण शहाणे लागून गेलात? हातात लेखणी आहे आणि लिहिण्याकरिता जागा आहे म्हणून हा अधिकार आपल्याला मिळाला आहे, अशा तो-यात वावरू नका. महाराष्ट्रातला कष्टकरी शेतकरी अशा तथाकथित बुद्धिवंतांचा अहंकार योग्य वेळी जिरवल्याशिवाय राहणार नाही. दुष्काळाच्या विरोधात सरकारने काही चुका केल्या असतील तर जे ठोकायचे असेल तर सरकारला ठोका. राजकीय पुढा-यांनी त्याचे फायदे घेतले असतील तर त्यांनाही झोडपा. कोण नको म्हणतो आहे? आणि कोणाची त्याबद्दल तक्रार आहे? पण, महाराष्ट्रातला कष्ट करणारा शेतकरी सर्रासपणे ‘बोगस’ आहे आणि तो खोटी बोंब मारतो आहे, अशा निर्णयाला येऊन या शेतक-याला झोडपण्याचे काम कराल तर महाराष्ट्रातला हा शेतकरी ते सहन करणार नाही. शिवाय अशा बुद्धिवंतांची किंमत केल्याशिवाय तो राहणार नाही आणि अशांना बुद्धिवंत तरी का म्हणायचे? संपादकपदावर बसले म्हणजे आकाशातून पडले? जगातल्या सगळ्या विद्वतेचा ठेका आपल्याला मिळाला, असे समजतात काय हे? का एवढी मस्ती आहे?
महाराष्ट्राच्या पत्रकारितेने शेतीत राबणा-या ७० टक्के शेतक-यांची दु:खे अनेक वेळा समजून घेतली आहेत आणि त्याच्यामागे ग्रामीण भागांतील पत्रकारांनी आपली लेखणी उभी केली आहे. शहरी पत्रकारिता वेगळ्या स्वरूपाची असली तरी ग्रामीण महाराष्ट्रातल्या शेतक-याची अशी बदनामी या शहरातल्या पत्रकारितेनेही या पूर्वी अशी कधी केली नव्हती आणि म्हणून हे स्पष्ट सांगण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील शेतकरी ‘बोगस’ नाहीत, त्याची बोंब बोगस नाही; पण, शेतक-याला ‘बोगस’ ठरवणारे हे ‘बोरुबहाद्दरच’ बोगस आहेत.
समव्यवसायी बंधूंवर लिहिताना मनाला वेदना होतच आहेत; परंतु, शेतक-याच्या विरुद्ध जे लिहिले गेले, त्याचा निषेध शेतकरी नेते, राजकारणी, ‘व्हॉट्सअॅप’वाले आणि अन्य मार्गानी होतही राहील. त्या निषेधाला राजकीय वासही येऊ शकेल; परंतु, जो शेतकरी शेतात राबणारा आहे, ज्याचा कुठल्याही चळवळीशी संबंध नाही, ज्याच्या नशिबी कष्ट आणि कष्टच आहेत, अशा शेतक-यालासुद्धा ‘बोगस’ ठरवले गेले आणि यामुळे त्याला होणा-या यातना, त्याचे दु:ख आणि त्याची भावना तो कुठे व्यक्त करणार आहे? त्याला कोणते व्यासपीठ आहे? आम्ही पत्रकार आमच्या अग्रलेखात त्याला झोडपू शकतो. त्याला ‘बोगस’ ठरवू शकतो आणि त्याला ‘बोंबल्या’ म्हणू शकतो. त्याने केलेले कष्ट, जिरायती असो किंवा बागायती जमीन असो, दोन्ही शेतक-याला कष्ट तेवढेच आहेत. जिरायतीवाल्यांना थोडे जास्त आहेत. त्याने उत्तम शेती केली, उत्पादन वाढवले तर आम्ही काही त्याच्यासाठी टाळ्या वाजवत नाही आणि त्याचा सत्कारही करत नाही. सचिन तेंडुलकरने शंभर सेंच्यु-या काढल्यावर आम्ही टाळ्या वाजवतो; पण तो २२ यार्डामध्ये धावतो. आमचा कष्टकरी शेतकरी हातात नांगर घेऊन शेताच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत अनेक सेंच्यु-या काढतोय. त्याची मोजदाद नाही आणि त्याच्याकरिता टाळ्याही नाहीत. टाळ्या नकोत; पण त्याच्या कष्टाला किमान ‘बोगस’ तरी म्हणू नका!
http://prahaar.in/editorial/edit/276171
............................................................................................
Sakal
मोडलेल्या मांडवांना आधार (अग्रलेख)
आपले सारे शब्दकोष सामूहिक व्यथा-वेदनांचे वर्णन करण्यासाठी अपुरे पडावेत, असे आस्मानी संकटाचे भोग सध्या राज्यातील शेतकरी भोगतो आहे. निम्म्याहून अधिक राज्य महाभयंकर दुष्काळात होरपळते आहे, तर त्यातून सुटलेला भूभाग गारपीट व वादळाच्या तडाख्यात उद्‌ध्वस्त झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणाने खरीप हातचा गेला, तर हवामानातील बदलाने रब्बी पिके व फळबागांचा बळी घेतला. या पार्श्‍वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्मिळ बनलेली शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता दाखवून तातडीने गारपीटग्रस्त भागाचा दौरा केला. विधिमंडळात मदतही जाहीर केली. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता ही मदत अपुरी आहे. बागायती शेती व फळबागांना जाहीर झालेले हेक्‍टरी अनुक्रमे १५ व २५ हजार रुपये तण काढायलाही पुरणार नाहीत, असा आक्षेप आहे. दुष्काळी भागासाठी पॅकेज जाहीर करून आठवडा उलटत नाही तोवर गारपीटग्रस्तांना दिलासा देताना सरकारी तिजोरीवर ताण येणार हे खरे असले तरी लक्षात घ्यायला हवे, की गारपिटीच्या तडाख्यात सापडलेली शेती भांडवली आहे. शेतकऱ्यांवर मोठे कर्ज आहे. त्यातूनच व्याजमाफी, कर्जवसुलीला स्थगिती आणि झालेच तर कर्जमाफी या मागण्या होत आहेत. नैसर्गिक संकटांवर शेतकऱ्यांकडील जमापुंजी यापूर्वीच्या, फयान वादळ व गारपिटीत कोलमडलेल्या बागा उभ्या करण्यात खर्ची पडली आहे. भांडवली मदत ही त्यांची मोठी गरज आहे. विशेषत: नाशिक-नगर, खानदेशातील शेतकरी यंदा बारापैकी आठ महिने अशा संकटांचा सामना करीत आहेत. विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या तुलनेने हे बागायतदार श्रीमंत. अशी तालेवार मंडळीच खचली तेव्हा इतरांचे ते काय. दुष्काळात गलितगात्र झालेला कापूस, सोयाबीन व धानाचा शेतकरी उभा करायला हवा.
आस्मानी संकटामुळे झालेल्या नुकसानाचे पडसाद पुढच्या दोन-तीन वर्षांमध्ये फलोत्पादक जिल्ह्यांच्या अर्थकारणावर उमटलेले दिसतील. आच्छादन केलेल्या बागांचे नुकसान तुलनेत कमी असते. तेव्हा, ठिबक, तुषार सिंचनाप्रमाणे आच्छादनासाठी व्यापक अनुदानाची गरज आहे. हवामानबदलाच्या दुष्परिणामांचा मुद्दा महत्त्वाचा आहे. शहरांमधील गाड्या, एअर कंडिशनचा चंगळवाद, त्यातील विषारी वायूंच्या उत्सर्जनामुळे ग्लोबल वॉर्मिंग, क्‍लायमेट चेंज यांसारखी संकटे भयावह बनली आहेत. त्यासाठी अजिबात कारणीभूत नसलेल्या शेतकऱ्यांना त्या संकटांचा फटका बसतो आहे. यावर दीर्घकालीन उपाय हवे आहेत. हिरवीगार शेते आणि वृक्षराजीच्या जोपासनेच्या माध्यमातून शेतकरी पर्यावरणाचे रक्षण करतो, कार्बन डायऑक्‍साईड नव्हे, तर ऑक्‍सिजनची निर्मिती करतो. तेव्हा शेतकऱ्याला कार्बन क्रेडिट द्यावे, अशी मागणी पुढे आली आहे. या वेगळ्या व न्याय्य मागणीवरही विचार व्हावा.
हल्ली शेतकऱ्याला काही द्यायचे म्हटले, की पोटशूळ उठणारे कमी नाहीत. शेतकरी अडचणीत आला, की आर्थिक शिस्तीच्या शहरी बोलघेवडेपणाला जोर येतो. शेतकरी कसा अव्यवहारी आहे हे सांगायची अहमहमिका लागते. दुसरीकडे उद्योगांना सवलती कशा दिल्याच पाहिजेत हे सांगायचीही चढाओढ असते. उद्योगांवर विकास, रोजगारनिर्मिती अवलंबून असल्याने ते आवश्‍यक आहे त्याच कारणांसाठी मोडणाऱ्या शेतकऱ्याला वाचवणे, दिलासा देणेही आवश्‍यक आहे. सगळीच व्यवस्था बाजारावर सोडायची, तर उत्पादक आणि ग्राहक दोघांनाही नाडणाऱ्या दलालांची चलती सुरू होते. म्हणूनच भांडवलदारीचे उघड समर्थन करणाऱ्या प्रगत देशातही शेतीची अनुदाने आणि उद्योगांना सवलती सुरू राहतात. दुष्काळ आणि गारपीट, अवकाळी असं महाराष्ट्रातील सध्याचे संकट अनेक भागात जगायचे कसे, असाच प्रश्न तयार करणारे आहे. आत्महत्या हा कडेलोटाचाच पर्याय असतो आणि शेतकरी या मार्गाने जाऊ लागतो, तेव्हा दिलासा देणारी पावले उचलणे हे सरकारचे कर्तव्यच आहे. राज्यकर्ते कोणीही असोत, ते करायला हवे. युतीच्या सरकारने त्या दिशेने पावले टाकली. अशी मदत कितीही केली तरी ती अपुरी असल्याची टीका होणार. विरोधात असताना अशीच भूमिका घेत आल्याने ती युतीलाही सहन करावी लागेल. मदतीचा हात देतानाच ती योग्य हाती पडेल यावरचे नियंत्रण तेवढेच महत्त्वाचे ठरते. मदत, कर्जमाफीचे अनुभव लक्षात घेता तातडीने आणि विनासायास गरजवंताच्या हाती मदत पडेल, अशी व्यवस्था केल्यास शेतकरी दुवा देईल. राज्य सरकार तातडीची मदत देतानाच दीर्घकालीन उपायांबद्दल बोलते आहे हेही चांगले लक्षण मानायला हवे. हवामानाची आगाऊ कल्पना देणारे यंत्रणेचे जाळे विणण्यापासून सिंचनाचे सूक्ष्म नियोजन, पीकपद्धतीचा नवा विचार, शेतीच्या अर्थपुरवठ्यात सुटसुटीतपणा आणणे, जिथं जे पिकते तिथेच त्या उत्पादनांवरचे प्रक्रिया उद्योग, त्यासाठीच्या मूलभूत सुविधांमध्ये गुंतवणूक अशी बहुपेडी उपायांची मालिका योजावी लागेल. हे वर्ष दुष्काळाच्या झळांमुळं सातत्यानं सरकारला मदतीसाठी पुढं यावं लागण्याचं आहेच; पण, तातडीचे कर्तव्य बजावताना दीर्घकालीन उद्दिष्टांवरची नजर हटू नये.
http://online3.esakal.com

शेती म्हणजे कुबेराचं देणं नव्हे...
(जयवंत पाटील, झी 24 तास,)
मुंबई | शेती म्हणजे काय असतं, हे शेतीत राबल्याशिवाय, शेतीसाठी पैशांची जमवा-जमव केल्याशिवाय कळतं नाही, शेतीत काम करून आलेला बाप, जेव्हा हातापायाची हाडं दुखवत, रात्रीचा कन्हत उठून बसतो, त्याच्या पोराला आणि त्या बापाला विचारा शेती म्हणजे काय असते आणि काय अडचणी येतात.
pudhe vacha....
http://zeenews.india.com/…/bl…/indian-farmer-and-pain/262652लोकसत्ता
..............
श्री गिरीश कुबेर

संपादक
मोबाईल-
9869415435
लोकसत्ता
फोन क्रमांक : ०२२ २२०२२६२७
०२२ ६७४४००००
फॅक्स क्रमांक : ०२२ २२८२२१८७
हे लोकसत्ता मुंबईचे फोन क्रमांक आहेत.
यांना या '' बळीराजाची बोगस बोंब '' या संपादकीयाबाबत जाब विचारा ! त्यांना शेतकर्‍यांच्या विरोधात जसे लिहीण्याचे स्वातंत्र्य आहे. ते चुकीचे असल्यामुळे त्याचा जाब विचारण्याचा शेतकर्‍यांनाही अधिकार आहे.

शुक्रवार, १२ डिसेंबर, २०१४

निवडणुकीत माध्यमांची भूमिका प्रशंसनीय :राज्यपाल राव

नागपूर : राज्यात अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकीत प्रसिद्धी माध्यमांची भूमिका प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी येथे केले.
नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट आणि मारपकवार परिवारातर्फे दिल्या जाणार्‍या दलित मित्र, स्वातंत्र्य संग्राम सेनानी चिंतामणराव मारपकवार स्मृती पत्रकारिता पुरस्कारांचा वितरण समारंभ शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे सहायक संपादक गजानन जानभोर यांना राज्यपालांच्या हस्ते गौरवान्वित करण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि २५ हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी वरिष्ठ पत्रकार कार्तिक लोखंडे आणि नितीन तोटेवार यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव यांना जीवनगौरव पुरस्काराने यावेळी गौरवान्वित करण्यात आले.
यावेळी मंचावर प्रफुल्ल मारपकवार, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रह्मशंकर त्रिपाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल्ल मारपकवार यांनी केले. संचालन जोसेफ राव यांनी तर चैतन्य मारपकवार यांनी आभार मानले.

पुरस्काराची रक्कम प्लॅटफॉर्म शाळेला
■ गजानन जानभोर यांनी पुरस्कार स्वरूपात मिळालेली २५ हजार रुपयांची रक्कम नागपुरातील प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिर निवासी शाळेला देणगी स्वरूपात दिली. घरून पळून गेलेल्या, वाममार्गाला लागलेल्या रेल्वे स्थानकावरील अनाथ मुलांचे संगोपन करण्याचे काम ही शाळा करीत असते.

फेसबुक वर शेअर करा

Facebook